

वर्धा: शिक्षण प्रणालीत अनेक बदल होत आहे. नवीन पिढी घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होत असले तरी या प्रणालीत सुधारणा होणे आवश्यक आहे. परीक्षेत कॉपी करणे ही एक प्रकारची लागलेली किड असून, तिचा बिमोड करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवून परीक्षेत पारदर्शकता निर्माण करा, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण, गृह ग्रामीण, गृहनिर्माण, सहकार व खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात शनिवारी २५ जानेवारी रोजी नागपूर विभागातील परीक्षा केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कॉपीमुक्त अभियान व गैरमार्गाविरूद्ध लढा या अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मार्गदर्शक म्हणून शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी वान्मथी सी., नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, नागपूर विभागीय मंडळाच्या अध्यक्ष माधुरी सावरकर, नागपूर मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी, शिक्षण सह संचालक दिपेश लोखंडे, माध्यमिक विभागाच्या शिक्षाणधिकारी मनिषा भडंग, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी नितू गावंडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, परीक्षेदरम्यान अनेक अडचणी येतात. या अडचणींची वेळीच सोडवणूक व्हावी व कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे अंमलात यावे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान एखाद्या चुकीमुळे पूर्ण विभाग दोषी ठरविल्या जातो. या पद्धतीच्या चुका होऊ नये, यासाठी ही कार्यशाळा आहे.
कॉपी करणाऱ्यांची वर्गवारी होणे गरजेचे आहे. पालकांचे मुलांवर प्रचंड दडपण असते. पालक आपल्या पाल्याने इतरांची बरोबरी केली पाहिजे असा पालकांचा उद्देश असतो. अशावेळी दडपणात आलेला विद्यार्थी गैर मार्गाचा अवलंब करतो. तर काही मुले आत्महत्येसारखे मार्ग पत्करातात. या पासून त्यांना परावृत्त करण्याची गरज आहे. शिक्षकांनी पालक व विद्यार्थींचे समुपदेशन करणे निकडीचे आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार मोठ्या प्रमाणात होत असतो. एकीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी कमी होत आहे तर दुसरी कडे ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याचे दिसून येते. अनेक विद्यार्थी त्या परिसरातील नसतात. प्रवेश वाढविण्यासाठी संचालक पास होण्याची हमी देतात यातून मग कॉपी करण्याचा प्रकार होतो. याला पायबंद घालणे गरजेचे आहे. वर्धेची भूमी ही गांधीजींची भूमी आहे. गांधी जिल्हा कॉपीमुक्त व्हावा यासाठी आपण सर्वांना प्रचंड मेहनत व नियोजन करावे लागेल, असेही ते म्हणाले.
परीक्षेदरम्यान गोंधळ होऊ नये, परीक्षेदरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख राहावी, यासाठी पोलिस विभागाची बैठक घेण्यात येईल. गावाच्या परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलांना सोपविण्यात संदर्भात चर्चा करण्यात येईल. भरारी पथकांनी आपले काम चोख पणे बजावावे. जेणे करून परीक्षेत गैरप्रकार होणार नाही. शालेय शिक्षण विभागाचे बजेट सर्वाधिक आहे. नवीन आदर्शवादी पिढी घडविण्याचे कार्य हा विभाग करतो. शासनाने शिक्षण विभागातंर्गत अनेक योजना सुरू केल्या आहे. या योजनांचा लाभ शाळांनी लाभ घेऊन आपली शाळा कशी चांगली करता येईल, यासाठी प्रयत्न करावे. आदर्श शाळा बनविण्यासाठी पीएम श्री, सीएम श्री व क्रीडांगण योजनेचे प्रस्ताव सादर करावे. शिक्षण विभागाने यासाठी शाळांना प्रेरीत करावे, असे डॉ. पंकज भोयर म्हणाले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची संधी देऊ नये. संधी दिली की त्याचा गैरफायदा घेतल्या जातो. पालकांचे देखील समुपदेश करणे गरजेचे आहे. कारण त्यांचे प्रचंड दडपण मुलांवर असते. मुले कशात आपले कॅरीयर घडू शकतात यावर देखील लक्ष देणे महत्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
प्रास्ताविकातून शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी 10 वी व 12 वी परीक्षेसंबंधी माहिती दिली. शाळांनी वर्ग खोल्या मध्ये सीसीटिव्ही लावण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आल्याची माहिती दिली. जिथे केंद्र असेल त्याकेंद्रावर तेथील शिक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती न करता अन्य शाळेतील शिक्षक ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
शिक्षणाधिकारी मनिषा भडंग, नागपूर बोर्डच्या अध्यक्ष माधुरी सावरकर यांनी परीक्षेसंबंधी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापकांच्या अडीअडचणी शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी जाणून घेतल्या. संचालन प्रा. संजय नाखले यांनी तर आभार शिक्षणाधिकारी प्राथ. नितू गावंडे यांनी मानले. कार्यशाळेला नागपूर विभागातील शिक्षण विभागाचे अधिकारी, प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.