

वर्धा : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ सर्कस मैदान रामनगर येथून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. आकर्षक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर, जय शिवाजी, जय भवानी च्या घोषणा व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वर्धा नगरी दुमदुमली.
आदर्श भारत घडविण्यासाठी आजच्या युवा पिढीने शिवरायांची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य देशासाठीच नव्हेच तर जगासाठी आदर्श आहे. शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरूण पिढीमध्ये रुजविण्यासाठी जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. शिवरायांचे कार्य देशातच नव्हे तर जगाने स्विकारले आहे, असे मनोगत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा प्रशासनाव्दारे आयोजित पदयात्रेचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी रेवैया डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा घडविण्यामध्ये माँ जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. महिला स्वत:पुरत्या मर्यादीत न राहता वैभवशाली व्यक्तीमत्व घडवित असतात. महिलांनी माँ जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आपल्या पाल्यांना चांगले संस्कार द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच कमी कालावधीत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेच्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल प्रशासानाचे कौतुक केले.
यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पदयात्रेच्या प्रारंभी एक पेड माँ के नाम संकल्पनेनुसार मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पदयात्रेमध्ये स्वत: पालकमंत्री यांनी इतर मान्यवरांसह सहभाग घेतला. पदयात्रेचा समारोप सर्कस मैदान येथे करण्यात आला. समारोप प्रसंगी क्रीडा विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांनी मल्लखांब, दांडपट्टा, योग, पारंपारिक पोषाखातील मुले, स्वच्छता अभियान इत्यादी पारंपारिक खेळांचे प्रात्याक्षिक केले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते जिल्ह्यातील युथ आयकॉन उज्वल ठाकरे, सारंग रघाटाटे, साहिल दरणे, गुरूप्रसाद साठोणे, प्रतिक पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा मेश्राम यांनी केले. संचालन ज्योती भगत यांनी तर आभार शिक्षणाधिकारी डॉ. नितू गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवा, विद्यार्थी-विद्यार्थींनी, महिला व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.