

वर्धा : नागपूर मार्गावर सेलू बायपास परिसरात कार अनियंत्रित होऊन उलटल्याने अपघात घडला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करून गावाकडे परत येताना गुरूवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
मृतकांमध्ये समीर सुटे, शुभम मेश्राम, सुशील म्हस्के (रा. सिंदी) यांचा समावेश असल्याची माहिती मिळते. अपघातात धनराज धाबर्डे हे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाढदिवस असल्याने चार जण कारने नागपूरकडे गेले होते. तेथून कारने वर्ध्याकडे परत येत होते. दरम्यान, सेलू बायपासवर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याचे कडेला जाऊन आदळले. यात शुभम मेश्राम, सुशील मस्के या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर धनराज धाबर्डे तसेच समीर सुटे या दोघांना प्रथम सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत असल्याने तातडीने नागपूरला हलविण्यात आले. वाटेत समीर सुटे यांचा मृत्यू झाला. धनराज धाबर्डे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरूवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद केली. घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने आपल्या वाहनासह घटनास्थळी धाव घेत जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी भेट दिली. घटनेची सेलू पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.