

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : आयसीसी चॅम्पीयन ट्रॉफी २०२५ च्या अंतिम क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटिंग लावणाऱ्या बुकीवर कारवाई करून ५ लाख ६१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सिद्धार्थनगर येथील विशाल उर्फ डॉक्टर प्रमोदराव मुन (वय ३२) रा. सिध्दार्थनगर याच्या घरी छापा टाकला. यावेळी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या अंतिम क्रिकेट सामना भारत विरूद्ध न्युझीलंड सामन्यावर वेगवेगळ्या मोबाईलद्वारे वेगवेगळ्या अॅपद्वारे ग्राहकांची आयडी तयार करून लाईव्ह मॅचवर ऑनलाईन किकेट जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले. त्याच्या ताब्यातून तीन मोबाईल, क्रिकेट जुगाराचे व सट्टापटी जुगाराचे १५,७२० रूपये, वेगवेगळया बँकेचे एटीएम आणि क्रेडीट कार्ड ७, बँकेचे पासबुक तसेच वाहन आदी ५ लाख ६१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष काबंळे, अमोल नगराळे, मंगेश आदे, दीपक साठे, प्रफुल पुनवटकर, अक्षय राउत, अनुप कावळे यांनी केली. आरोपी हा क्रिकेट बेटिंगसाठी साथीदार अक्षय मेंढे (रा. समतानगर, वर्धा) हा क्रिकेट जुगाराकरीता ग्राहकांना लागणारी आयडी ऑनलाईन पद्धतीने तयार करून देत होता. जास्त रकमेचे व्यवहार योगेश पंजवाणी (रा. दयालनगर, वर्धा) याच्याकडे करीत असल्याची माहिती पुढे आली. त्यावरून तिन्ही आरोपींविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.