वर्धा, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी महिला निधी लिमिटेडमध्ये अनेक खातेधारांनी लाखो रुपये गुंतविले होते. मात्र ही रक्कम मिळत नसल्याने खातेदारांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वामध्ये विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी खातेदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. संस्थाध्यक्षांसह संचालकांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करत खातेदारांचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली.
शेतकरी महिला निधी लिमिटेडमध्ये हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या बँकेतून खातेदारांना त्यांचेच पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या बँकेच्या विविध शाखांमध्ये सात हजारहून अधिक खातेदारांची कोट्यावधींची रक्कम अडकलेली आहे. ती रक्कम तातडीने खातेदारांना परत देण्यात यावी. बँकेकडून 15 फेब्रुवारी 2024 पासून व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
शेतकरी महिला निधी लिमिटेडचे अध्यक्ष शरद कांबळे यांनी 10 एप्रिल 2024 पासून 25 मे 2024 पर्यंत सर्व खातेदारांची रक्कम परत करण्यासाठी स्टॅम्पवर वचन दिले होते. त्याकरिता दिलेली 45 दिवसांची मुदत 25 मे रोजी पूर्ण झाली. अद्याप ग्राहकांना पैसे देण्यात आले नाहीत. यावर तोडगा काढण्याची मागणी करत विश्रामगृह येथून निघालेल्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले यांना सादर केले. मोर्चात मोठ्या संख्येने खातेधारक सहभागी होते.
यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर आणि प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले यांच्या संबंधित विषय तातडीने निकाली निघावा या हेतूने सकारात्मक चर्चा केली. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपविभागीय महसूल अधिकारी दीपक कारंडे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विधी अधिकारी तपस्या पांडे, पोलिस निरीक्षक कांचन पांडे, अशोक कलोडे आदींची यावेळी उपस्थिती होती. नागरिकांच्या ठेवी रक्कमा परत मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. खातेधारकांना न्याय मिळाला नाही तर विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करू, असे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
हेही वाचा :