दोन ऑक्टोबरपासून भाजपची ‘ओबीसी जागर यात्रा’ : ४४ विधानसभा, ९ लोकसभा क्षेत्रांचा समावेश

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश, भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित ओबीसी जागर यात्रेचा दोन ऑक्टोबर रोजी पारडी येथून शुभारंभ होणार आहे.
ही यात्रा महाराष्ट्रात सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सुमारे ४४ विधानसभा व लोक नऊ लोकसभा क्षेत्रांत मार्गक्रमण करेल. यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आमदार डॉ. आशिष देशमुख व ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते करणार आहे. या जागर यात्रेला संपूर्ण मार्गदर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत. यात्रेच्या दरम्यान ९ वर्षातील ओबीसीकरिता केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची विस्तृत माहिती देणारे पत्रक सुमारे दोन लाखाहून अधिक पत्रक सर्वसामान्य जनतेमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. यात्रेचा शुभारंभ नगाजी महाराजांचे श्रीक्षेत्र पारडी येथून करण्यात येणार आहे. शुभारंभाप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार संगमलाल गुप्ता, खासदार रामदास तडस, आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित राहणार आहे. यात्रेचा समारोप श्री क्षेत्र पोहरादेवी जिल्हा वाशिम येथे करण्यात येणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, भागवत कराड, अतुल सावे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ के लक्ष्मण व विदर्भातील आमदार व खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार माध्यमातून ओबीसींकरिता राबविण्यात येणार्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घेऊन या जागर यात्रेमध्ये सामील होण्याचे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, शहराध्यक्ष निलेश पोहेकर उपस्थित होते.