वर्धा : अल्लीपूर येथील युवतीच्या हत्येप्रकरणी ३६ तासांत आरोपीस अटक

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : हिंगणघाट तालुक्याच्या अल्लीपूर येथील युवतीची गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी ३६ तासाच्या आत आरोपीस अटक केली.
अल्लीपूर येथील उत्तम वैद्य यांची मुलगी शामल ही घरी २२ सप्टेंबर रोजी संशयास्पद मृतावस्थेत आढळली होती. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, अल्लीपूर ठाणेदारांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवुन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन अल्लीपूर यांच्या पथकाने गोपनीय तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न करून संयुक्तरित्या आरोपी शोध मोहिम सुरू करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा यांचे २ शोधपथक तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यांनी आरोपीचा राळेगाव, कळंब, यवतमाळ, बाभुळगाव, देवगाव परिसरात शोध घेतला. दरम्यान संशयीत आरोपी हा धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांच्या पथकाने सदर ठिकाणी मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेवुन चौकशी केली. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी आशिष रमेशराव आढाऊ (वय ३४), रा. गणोरी ता. बाभुळगाव जि. यवतमाळ याने प्रेमप्रकरणातून भेटण्याचे टाळत असल्याने रागातून घरी येवुन तिची वायरने गळा आवळून हत्या केली. आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, ठाणेदार प्रफुल डाहुले, सहायक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, हमिद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, दिनेश बोधकर, मनिष कांबळे, प्रदिप वाघ, अक्षय राउत यांनी केली.