वर्धा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी वर्ध्यात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. १७ जणांचा या उपोषणात सहभाग आहे. संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्त्वात तीन दिवसापासून आंदोलन सुरू असून तिसर्या दिवशी प्रकृती खालावल्याने एका उपोषणकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
१ नाव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व विभागातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. सरकारने दखल घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, तसेच पाणी घेणेही सोडण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांमध्ये संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर, गोविंद उगले, शैलेश राऊत, प्रवीण बहादे, संजय सोनार, प्रमोद खोडे, श्रीकांत विघे, अरवींद सुरोशे, विक्रम रजपूत, श्यामप्रसाद बांगर, मोगलाजी जोरगेवार, राजीव गावंडे, भारत पारखे, मोहन सोनटक्के, अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने उपोषणकर्ते संजय सोनार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सरकारने दखल घेईस्तोवर आंदोलन सुरूच राहील, असे आंदोलकांनी सांगितले.