

वर्धाः वर्धा जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात वीजचोरीचे तब्बल 1 हजार 225 गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला सुमारे 1 कोटी 93 लाख 11 हजार रुपयांच्या 1 लाख 33 हजार 489 युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या 60 ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
महावितरणने वीजचोरी विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये 1 हजार 225 वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी 1 हजार 213 ग्राहकांकडून तडजोडीपोटी 38 लाख 14 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीजचोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या 365 ग्राहकांचा समावेश आहे. तर, 860 ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दूरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यांसारख्या गैरमार्गांचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या 60 ग्राहकांनी 3 हजार 587 युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना 7 लाख 80 हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण सातत्याने कठोर पाऊले उचलत आहे. नागपूर परिमंडलात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एप्रिल 2024 ते मार्च 2025 या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे किंवा बंद करणे यांसारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे. आता महावितरणने वीजचोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत, सदोष मीटर तसेच सरासरी वीज बिल असलेल्या सर्वच ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.