Wall Collapse : भिंत कोसळून चिमुकली ठार; लाखांदूर तालुक्यातील घटना

File Photo
File Photo

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : खाऊ घेण्यासाठी दुकानात जात असलेल्या तीन वर्षीय बालिकेचा वादळीवाऱ्यामुळे भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे रविवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. देविका प्रकाश दिघोरे (वय ३ वर्ष, रा. सोनी) असे चिमुकलीचे नाव आहे. लाखांदूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी (दि. ७) सायंकाळच्या सुमारास देविका गावातीलच एका किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. दरम्यान सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या एका घराची मातीची भिंत तिच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. नागरिकांनी तात्काळ धाव घेत विटा बाजूला करीत तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. तेव्हा आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज उईके व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेची माहिती समजताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत मृत बालिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाकडून मदत मिळवून देऊ असे अश्वासन देखील त्यांनी दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news