file photo
file photo

जुन्या वादातून तरुणाचा खून, जळालेल्या मृताची ओळख पटली; नागपूरच्या दोघांना अटक

Published on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडेगाव येथील वनविभागाच्या लाकूड आगाराजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद तन्वीर अब्दूल रज्जाक शहा (वय २४, रा. मुद्दलियार ले-आऊट, शांतीनगर नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अतिक लातीफ शेख (वय २९, रा. शांतीनगर नागपूर) व फैजन परवेझ खान (वय १८, रा. विहाड हिंगणा, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

गडेगाव येथील वन विभागाच्या लाकूड आगाराजवळ (दि. १३ एप्रिल) जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. लाखनी पोलिसांनी पंचनामा करुन गुन्हा नोंदविला आणि तपासाला सुरुवात केली. या घटनेचा तपास साकोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले. या पथकाने विदर्भातील सर्व जिल्हे, शेजारील राज्यातील बेपत्ता पुरुषांची माहिती गोळा केली. तपासादरम्यान पोलीस स्टेशन शांतीनगर येथे एका बेपत्ता पुरुषाची नोंद आढळली. त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता बेपत्ता इसम मोहम्मद तन्वीर अब्दूल रज्जाक शहा हा ६ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडून माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान मृत मोहम्मद याचा मित्र अतिक शेख आणि फैजन यांच्यासोबत जुना वाद असल्याचे आढळून आल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशी दरम्यान त्यांनीच मोहम्मदचा खून केल्याचे कबूल केले.

आरोपी अतिक याचे मृत मोहम्मद आणि त्याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्यामुळे मोहम्मद व त्याचा भाऊ हे अतिक शेख याला मारणार होते. त्यामुळे अतिकने ७ एप्रिल रोजी गड्डीगोदाम-नागपूर येथे मोहम्मद याची माफी मागितली आणि फिरण्यासाठी चल म्हणून आग्रह केला. मोहम्मद आणि अतिक हे चारचाकीने (क्र. एमएच ४० डीजी २२८२) मिठानीम दर्गा येथे गेले. त्यानंतर आरोपी अतिकने त्याचा भाचा फैजन याला फोन करुन बोलावून घेतले. तिघेही दुपारच्या सुमारास भंडाराकडे निघाले. त्यानंतर गडेगाव आगाराजवळील जंगल परिसरातील तलावाजवळ पोहचून कार थांबविली. तिघेही खाली उतरले. त्यांच्यात चर्चा सुरू असताना मोहम्मद याने आरोपी अतिक यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 'तु माफी माग किंवा काही कर, परंतु माझा भाऊ तुला मारल्याशिवाय राहणार नाही', असे बोलून शिवीगाळ केली. तेव्हा आरोपी अतिक याने फैजान याच्यामदतीने दुपट्ट्याने मोहम्मदचा गळा आवळून आणि चाकुने वार करुन ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकला. परंतु, पोलास आपल्याला पकडतील या भीतीने डिक्कीतून मृतदेह बाहेर काढून जंगलात टाकले. तसेच चारचाकीतील डिझेल मोहम्मदच्या अंगार टाकून पेटवून दिले. त्यानंतर दोघेही कारने नागपूरला निघाले.

मोहम्मदचा मृतदेह पूर्णत: जळालेला होता. फक्त त्याच्या पॅन्टवर 'जे.एस.' असा मार्क दिसून आला. त्यावरुन कुटूंबियांनी त्याची ओळख पटविली. आरोपींची कार नागपूरातून भंडारा व भंडाराकडून नागपूरला गेल्याचे माथनी टोलनाक्यावरील सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली आहे.  दोन्ही आरोपींना बुधवारी (ता. १९) नागपूरातून अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूल देशपांडे, लाखनीचे ठाणेदार मिलींद तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी, नितेश देशमुख, ऋषीकेश चाबुकस्वार, धनराज सेलोकर, माधव परशुरामकर, राजेंद्र कुरुडकर, प्रशांत गुरव, विजय राऊत, कापगते, रामटेके, माळोदे, पुराम, श्रावणकर यांनी केली.

'त्या' महिलेच्या खुनाचे रहस्य गुलदस्त्यात

अत्यंत निर्दयतेने खून करुन राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील स्मशानभूमीत पोत्यात भरुन टाकलेल्या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. महिलेच्या हातावर 'सपना' नाव गोंदलेले आहे. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या सर्वच महिलांची माहिती काढली. परंतु, अद्याप त्या महिलेची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्या महिलेचे हत्येचे गुढ उकलणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news