नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भाजपच्या खूपच जिव्हारी लागले. आज (दि. ११) ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचा पुतळा भाजपने जाळला, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. मात्र आता उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळणाऱ्या भाजपला त्याच शैलीने, जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना-ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. बुधवारी (दि. ११) दुपारी ३ वाजता व्हेरायटी चौकात हे ठाकरे गटाचे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हिंमत असेल तर आम्हाला रोखून दाखवा, असा इशारा रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी गृहमंत्र्यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे रवाना झाल्यानंतर ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले विमानतळावरचे फलक फाडणाऱ्या तसेच त्यावर काळे फासणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पत्रकार परिषदेत जाधव म्हणाले, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचा अपमान आता ठाकरे गट सहन करणार नाही. सरकार किती लोकांना जेलमध्ये टाकणार ते आम्ही बघतो. कोणी आमच्या अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेऊ असेही ते यावेळी म्हणाले. लोकभावना आहेत त्या उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या. रस्त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, पुतळा जाळणे होत असताना पोलीस बघत होते. परवानगीशिवाय आंदोलन करीत असताना पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? गृहमंत्र्यांच्या शहरात भाजप कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देत होते, असा आरोपही ठाकरे सेनेच्यावतीने करण्यात आला. इतर बाबतीत फुटेज पाहून गुन्हे दाखल करणारे पोलीस आता का घाबरत आहेत असाही सवाल यावेळी उपस्थित केला गेला. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडणे हा महाराष्ट्रासाठी कलंक नाही तर काय आहे ?असा सवाल उपस्थित केला. यावेळी जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहर प्रमुख नितीन तिवारी, पूर्व विदर्भाचे संघटन प्रमुख सतीश हरडे, हर्षल काकडे, माधुरी पालिवाल आदी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर भ्रष्टाचारावर बोलूच नये. ऊर्जामंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळातील कोराडी औष्णिक ऊर्जा प्रकल्प, कोळसा आणि रेतीघाटाचे घोटाळे घेऊन आम्ही समोर येतो असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला.