

नागपूर : नरखेड तालुक्यातील नारसिंगी येथील प्रविण कवडेती हा युवक जाम नदीच्या पुरात वाहून गेला असून १० दिवस उलटूनही त्याचा काही ठावठिकाणा लागलेला नाही.
मंगळवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कवडेती कुटुंबीयांना भेटून त्यांना धीर दिला. पिडीत कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी यासाठी जिल्हाधीकारी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.
प्रविण हा जाम नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतर पाच दिवस उलटूनही SDRF (State Disaster Response Force) चे पथक घटनास्थळी आले नव्हते. देशमुखांच्या बोलण्यापासून सहाव्या दिवशी SDRF ची टीम घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू झाले, परंतु उशीर झाल्यामुळे अद्याप प्रविणचा शोध लागलेला नाही. मृतदेह न सापडल्यामुळे शासनाने तातडीची आर्थिक मदत देऊ शकत नसल्याचे सांगितले.
यावेळी अनिल देशमुख यांच्यासोबत माजी जि.प. सभापती बालु जोध, पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक, खरेदी-विक्रीचे सभापती घनश्याम ठाकरे, ज्ञानेश्वर काकडे, अतुल पेठे, नारायण ठाकरे, अमोल कोठे, प्रशांत ऐडके, रामु नासरे, रोशन नागमोते आणि इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, नरखेड तालुक्यातील जामगाव येथील धनराज बोरीवार हा कड नदीच्या पुरात ७ दिवसांपूर्वी वाहून गेला असून त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. अनिल देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना केली.