

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या आणि उल्कापातामुळे निर्माण झालेल्या जागतिक कीर्तीच्या 'लोणार सरोवरा'चा 'इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस'च्या (आययूजीएस) प्रतिष्ठित 'तिसऱ्या १०० भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या' (थर्ड हंड्रेड आय-यू-जी-एस जिऑलॉजिकल हेरिटेज साईटस्) यादीत समावेश झाला आहे.
पृथ्वीचा इतिहास आणि भूवैज्ञानिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्थळांना 'आययूजीएस'कडून असाधारण वैज्ञानिक मूल्यासाठी मान्यता दिली जाते. २०२२ मध्ये स्पेनमध्ये पहिली १०० आणि २०२४ मध्ये दक्षिण कोरियात दुसरी १०० स्थळे जाहीर करण्यात आली होती. त्याच धर्तीवर जगभरातील ४७ देशांमधील निवडक १०० भूवैज्ञानिक आश्चर्यांची ही तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जपानचा माऊंट फुजी, नॉर्वेचे फ्योर्ड्स आणि अमेरिकेतील सॅन अँड्रियास फॉल्ट यांसारख्या जागतिक स्थळांसोबत आता लोणार सरोवरालाही स्थान मिळाले आहे.
बुलढाण्यातील लोणार विवर हे पृथ्वीवरील सर्वात तरुण (सुमारे ५२,००० वर्षे जुने) आणि सर्वोत्तम जतन केलेले उल्कापात विवर आहे. सुमारे १.८८ किमी व्यास असलेले हे विवर ६.५ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकांमध्ये वसलेले आहे. बेसाल्ट खडकांमध्ये तयार झालेले हे पृथ्वीवरील केवळ पाच ज्ञात उल्कापात विवरांपैकी एक असल्याने त्याचे वैज्ञानिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या सरोवराचे पाणी खारट व अल्कधर्मी असून, येथे वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था निर्माण झाली आहे.
'भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण' (जीएसआय) संस्थेने या प्रतिष्ठित जागतिक यादीत समावेशासाठी प्रस्ताव सादर केला होता. या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे लोणार सरोवराला जागतिक स्तरावर अधिक ओळख मिळेल आणि या अनमोल भूवैज्ञानिक वारशाचे संवर्धन व शैक्षणिक संशोधनासाठी उपयोग होण्यास मोठी मदत होईल, असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लोणार सरोवराची मुख्य वैशिष्ट्ये
स्थान : बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र (छत्रपती संभाजीनगरपासून साधारण १५० कि.मी. अंतर).
निर्मिती : अंदाजे ५२,००० वर्षांपूर्वी दख्खन पठारावरील बेसाल्ट खडकावर उच्च वेगाने झालेल्या उल्कापातामुळे या विवराची निर्मिती झाली.
पाण्याचे स्वरूप : हे पाणी खारट आणि अल्कधर्मी आहे.
आकार व खोली : सरोवराचा व्यास साधारण १.२ ते १.८ कि.मी. आहे आणि विवराची खोली सुमारे १३७ ते १५० मीटर आहे.
पाण्याचा रंग : विशिष्ट सूक्ष्मजीवांमुळे या सरोवराच्या पाण्याचा रंग ऋतूनुसार हिरवट किंवा गुलाबीसर होतो.
ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व : या सरोवराच्या परिसरात
११ व्या ते १२ व्या शतकातील (चालुक्य व हेमाडपंथी काळातील) सुमारे १५ प्राचीन मंदिरे आहेत. यात भगवान विष्णूंचे प्रसिद्ध दैत्यसूदन मंदिर लोणार शहराच्या मध्यभागी आहे.
संरक्षण आणि दर्जा :
१९७९ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (जीएसआय) याला राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारक घोषित केले.
सप्टेंबर २००० मध्ये लोणार वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आले.
नोव्हेंबर २०२० मध्ये याला रामसर स्थळ (रामसर साईट) म्हणून मान्यता मिळाली.
भेट देण्याचा उत्तम काळ : ऑक्टोबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो.