

नागपूर : नागपूर शहरातील महाल गांधीगेट परिसरात १७ मार्च रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
जमावातील काही व्यक्तींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी केली, ही अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. संबंधित आरोपींची तातडीने ओळख पटवून चौकशी करावी. यासोबतच यावेळी अन्य महिला नागरिकांनाही त्रास झाला का? हे देखील तपासले जावे. समाजात पोलीस दलाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले गंभीर आणि असह्य असून अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचलण्यात येतील, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.