

नागपूर : काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन महादेववर अविश्वास व्यक्त केला आहे. जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत कुठलीही घोषणा करत नाही, तोपर्यंत आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, असा हल्लाबोल मंगळवारी (दि.29) त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
पहलगाममधील दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला जात आहे, पण हा शोध इतक्या दिवसांनी का लागला? देशात लपून बसलेल्यांना शोधायला वेळ जातो, आणि मग म्हणे देशात घुसून मारण्यात आले. यावर भारतीय लष्कराने अधिकृत दुजोरा दिल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवणार नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.
सरकारचा कारभार म्हणजे 'इजा-बिजा-तीजा' आहे. आता त्यांना काय म्हणायचे, हेच समजेना झाले आहे. माणिकराव कोकाटे हे भ्रष्ट' मंत्री आहेत. जर सरकारने त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला नाही, तर हे सरकार शेतकरी आणि जनतेविरोधात बेईमानी करत आहेत असाच अर्थ निघेल. असे वडेट्टीवार म्हणाले. अशा कलंकित मंत्र्यांना काढण्याची सरकारची इच्छा नसेल, तर त्यांचे शुद्धीकरण तरी करा. श्रावण महिना सुरू आहे. गायीचे गोमूत्र शिंपडून, शंकराच्या पिंडीसमोर बसवून त्यांचा अभिषेक करा. मग जनतेला सांगता येईल की शुद्धीकरण झाले आहे. कारण हनी ट्रॅप प्रकरणावर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते आधीच अशुद्ध झाले आहेत, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या महामंडळांवरही वडेट्टीवारांनी ताशेरे ओढले.“हा केवळ नवीन ‘लॉलीपॉप’ आहे. तीन पक्षांची कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, पण कोणाला काय मिळणार हेच कळेना झाले आहे. निवडणुकीसाठी हा नवा फंडा आणला आहे. मंत्री सगळं दाबून खात आहेत आणि कार्यकर्ते मात्र निराश आहेत. म्हणून कार्यकर्त्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याचे नाटक सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.