

नागपूर : मिहान एव्हिएशन क्षेत्रात अंबानी समूहाने मोठी गुंतवणूक केल्यानंतर अदानी उद्योग समूह देखील आता नागपूर विदर्भात ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. एकीकडे स्मार्ट मीटरला विरोध होत असताना अदानीची भक्कम पावले विदर्भात औद्योगिकीकरणाच्या शक्यता वाढविणार आहे.
टाटा एअरबेसचा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेल्यानंतर ही मोठी गुंतवणूक आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील 600 मेगावॉट वीज निर्मिती क्षमता असलेली पण उद्दिष्टपूर्तीत अपयशी, दिवाळखोर ठरलेली कोळसा वीज उत्पादक कंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) ४ हजार कोटी रुपयांच्या मोबदल्यात अदानी पॉवर लिमिटेडने ताब्यात घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात अदानी समूहाने नुकतीच माजी खासदार दत्ता मेघे यांच्या समूहातील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय अधिग्रहण केले. आता बुटीबोरी येथील वीज प्रकल्पाच्या माध्यमातून अधिग्रहण पूर्ण केल्यानंतर अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्रात आपले अस्तित्व बळकट करणार आहे. वाढीव गुंतवणुकीसोबतच ऑपरेटिंग क्षमता १८,१५० मेगावॅटपर्यंत वाढवली जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे स्थित व्हीआयपीएलचा हा ६०० मेगावॅटचा घरगुती कोळशावर चालणारा वीज प्रकल्प आहे. कंपनी दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया (CIRP) मधून जात होती. १८ जून २०२५ रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) च्या मुंबई खंडपीठाने अदानी पॉवरच्या ठराव योजनेला मान्यता दिली. त्यानंतर, ७ जुलै रोजी ही योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यात आली.
अदानी पॉवरच्या धोरणात व्हीआयपीएलचे अधिग्रहण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे," असे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.बी. ख्यालिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अदानी पॉवर ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बेस लोड पॉवर जनरेशन कंपनी असून २०३० पर्यंत ३०,६७० मेगावॅटची ऑपरेशनल क्षमता त्यांनी साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
अदानी पॉवर कंपनी ब्राउनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या मिश्रणाद्वारे तिच्या बेस लोड पॉवर जनरेशन पोर्टफोलिओचा विस्तार करीत असून अदानी ग्रुप कंपनी सध्या मध्य प्रदेशातील सिंगरौली-महान, छत्तीसगडमधील रायपूर, रायगड आणि कोरबा आणि राजस्थानमधील कवई येथे प्रत्येकी १,६०० मेगावॅट क्षमतेचे सहा ब्राउनफिल्ड अल्ट्रासुपरक्रिटिकल पॉवर प्लांटची उभारणी करीत आहे, याशिवाय उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १,६०० मेगावॅट ग्रीनफिल्ड यूएससीटीपीपी आणि कोरबा येथे १,३२० मेगावॅट क्षमतेच्या सुपरक्रिटिकल पॉवर प्लांटचे बांधकाम देखील सुरू आहे. हा प्रकल्प कंपनीने पूर्वी विकत घेतला होता.