

नागपूर : भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेचा लोक प्रशासनातील नवोपक्रमासाठी दिल्या जाणारा यावर्षीचा ‘डॉ. एस.एस.गडकरी’ पुरस्कार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना जाहीर झाला आहे. नागपूर विभागात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीची पारंपारिक पध्दतीने नोंद केल्या जात होती. पंचनामा अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग एप्लिकेशन सेंटरच्या मदतीने एक ॲप विकसीत केले. या ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीचे फोटो घेवून अचूक माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे. ही अभिनव संकल्पना प्रायोगिक स्तरावर नागपूर विभागात राबविण्यात आली आहे.
ई-पंचनामा या उपक्रमामुळे नुकसानीसंदर्भात अचूक माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे. यामुळे वेळेची सुद्धा बचत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुलभ झाले आहे. ही पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. विभागाने सर्व सहा जिल्ह्यांमध्ये या अॅपची यशस्वी प्रायोगिक आणि क्षेत्रीय चाचण्या घेऊन सहजतेने, अचूकता, वेग आणि पारदर्शकता दर्शविली.
ॲप वापरून विविध स्तरांवर कोणते पंचनामे केले जाऊ शकतात आणि मंजूर केले जाऊ शकतात याबद्दलची कल्पना प्रत्यक्षात यशस्वीरीत्या पार पाडली. श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांची अमेरिका येथील विशिष्ट हॅम्फ्रे फेलोशिपसाठी निवड झाली आहे. श्रीमती बिदरी यांना प्रशिक्षणानंतर धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात येईल. अशी माहिती, संस्थेचे अध्यक्ष स्वधीन क्षत्रिया यांनी दिली.