

नागपूर : तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंत्री म्हणून कामकाज करणार हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, आज मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, कोर्टात पुढील सुनावणी ५ मार्च रोजी आहे. असं असताना कृषीमंत्री या पदावर माणिकराव कोकाटे बसू शकत नाही.
सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे, त्यांना शिक्षा झाल्याने ते मंत्री म्हणून अधिवेशनात कसे सहभागी होऊ शकतात? त्यांची आमदारकी रद्द का अजून झाली नाही हा संशोधनाचा प्रश्न आहे. दोषी असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकत नाही. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अधिवेशनाच्या कामकाजात मंत्री म्हणून कोकाटे यांना सहभागी करू नये, असेही वडेट्टीवार म्हणाले.
एक मंत्री ज्याला स्वतःला भ्रष्टाचार आणि कागदपत्रांची फेरफार प्रकरणात कोर्टाने आरोपी म्हणून शिक्षा सुनावली आहे तो मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे काय काम करणार ? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.