

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी अहवाल आला असून सर्वकाही स्पष्ट असताना ठोस कारवाई व्हावी, लोकांचा आदर सरकार करेल, बोलघेवडेपणा सरकारने करू नये, गुन्हे दाखल करावे मगच खरी मर्दुमकी दिसेल, हिंमत असेल, तर कठोर कारवाई करा, असे आव्हान काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारला दिले आहे.
शिक्षण घोटाळा महाभयंकर आहे. उल्हास नरडला बळीचा बकरा केले जात आहे, अंतिम निर्णय हा फाईलच्या चौकशीच्या शेवटी असतो. खालचे चोर सोडून नरडचा राजकीय बळी घेतला जात आहे. यात अनेक शाळा, सत्ताधारी पक्षातील आणि जवळच्या लोकांचा संबंध आहे. संस्थाचालक यांनी मान्यता दिल्यावरच प्रस्ताव उपसंचालक यांच्याकडे जातो. त्यामुळे खाली देखील चुकीचे झाले आहे. उल्हास नरडने उलट पत्र देऊन चौकशीची मागणी केली. यापूर्वी कारवाई झालेला डोरलीकर हा कुणाच्या जवळचा आहे. ते आम्हाला माहीत आहे. एसआयटी चौकशी, विभागीय चौकशी होऊ द्या, समिती नेमा, पूर्वी समितीचा अहवाल आल्यावर कारवाई होत होती. पण इथे थेट नरडला अटक करण्यात आली आहे. मागील 5 ते 7 वर्षात सत्ताधारी नेत्यांच्या, जवळचे नातेवाईक यांच्याच संस्था वाढल्या आहेत. या संदर्भात एसआयटी, आवश्यता असल्यास न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.
दरम्यान, लाडकी बहीण योजना ज्यावेळी लागू केली. तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का? ज्याला कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना केंद्र सरकार 1500 देत होते, त्यांना फायदा झाला असता, पण दीड हजारात घर चालते का? यांना आता 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येत आहे. केंद्राकडून पैसे मिळतात म्हणून पैसे कमी करणे, हे चुकीचे आहे. विविध क्लुप्त्या लढवणे हे चुकीचे आहे. पैशाची तरतूद असेल म्हणून हा एसटी कामगार साठी जीआर काढला, आता पैसे नाही दिले तर बनवाबनवी होईल, असा आरोप त्यांनी केला.