

नागपूर : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी 92 टक्के असेल. गडचिरोलीचा अपवाद वगळता नागपूरसह विदर्भात कमी पाऊस असेल. मान्सून हा अर्थव्यवस्थेचा कणा लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल याकडे आज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ प्रवीणकुमार यांनी लक्ष वेधले. अर्थ वर्ल्ड डे च्या निमित्ताने वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
उष्णतेच्या लाटा, आरोग्य आणि हवामान वार्तांकन यासंदर्भात प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर, मुंबई प्रेस क्लब आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात संशोधक गजेंद्र कुमार, डॉ. प्रवीण कुमार, डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी साथरोग विभाग, महाराष्ट्र आरोग्य सेवा (निवृत्त),सुहास जोशी उपस्थित होते.
विदर्भातील उष्णतेच्या लाटा, हवामानविषयक संज्ञा, वातावरण बदल आणि उष्णतेच्या लाटा, आरोग्यावरील परिणाम यावर चर्चा झाली. It’s Only 47°C लघुपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. आम्हीच आमच्यामुळे संकटात आलेल्या पृथ्वी, वसुंधरेला वाचवू शकतो. यादृष्टीने भविष्यकाळात हर घर मौसम... पोहचविणे लक्ष्य आहे. कधीकाळी मर्यादित असलेला हवामान विभागाचा वापर आज व्यापक झाला आहे. लग्न कार्यासाठी देखील लोक हवामानाचा अंदाज विचारत आहेत असे डॉ प्रवीणकुमार यांनी सांगितले.
नागपूरच्या डॉपलर वेदर रडारच्या माध्यमातून पाचशे किलोमीटरपर्यंतचे हवामान कळू शकते. विदर्भात नागपूर, अकोला, चंद्रपूर, गोंदिया या चार स्थायीसह एकंदर 12 हवामान केंद्र आहेत. यावर्षी विदर्भात 45 अंश सेल्सिअसवर तापमान गेल्याने हिट वेव्हचा धोका आहे. महाराष्ट्रात अँटी सायक्लोनिक सिस्टीममुळे तापमान दिवसा आणि रात्री वाढत आहे. येणाऱ्या 30 वर्षात तापमान किमान 2 ते 3 अंशाने वाढण्याचा धोका आहे. हिवाळा कमी होत चालला असून उन्हाळा जूनपर्यंत गेला आहे. पर्जन्यमान तितकेच पण पावसाचे दिवस कमी झालेत. गेल्या 10 वर्षात हिट वेव्ह वाढत आहेत. 2 मे 2014 रोजी अमरावतीला आजवरचे सर्वाधिक 49.8 अंश सेल्सिअस होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
11 टक्के वाढतो हृदयरुग्णांना धोका - डॉ प्रदीप आवटे
दरम्यान, वाढत्या उष्णतामानात 11 टक्के हृदय रुग्णांना धोका वाढतो. कष्टकरी वर्गाला परिणाम जाणवतो. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.रक्तदाब कमी होतो. हृदयाला अधिक काम करावे लागते. किडनी, फुफुसाचे आजार वाढतात. 18 टक्के हॉस्पिटलायझेशन वाढते. पाणी भरपूर प्या, एकावेळी पोटभर जेऊ नका, मसाले टाळा,चहा,कॉफी,मद्यपान टाळा अशा सूचना करताना अहमदाबादनंतर नागपूरचा हिट ऍक्शन प्लॅन तयार झाला यामुळे मृत्यूचे प्रमाण 1190 ने कमी झाले असा दावा अभ्यास अहवालावरून डॉ आवटे यांनी केला.