

नागपूर : नागपूरमधील महाल, गांधीगेट शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी एकीकडे शिवभक्तांची गर्दी पहायला मिळाली. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे आज सोमवारी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. राज्यभरात अशाच पद्धतीने आज हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या.
औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती विहिपचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली. शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विहिप, बजरंग दल पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाचे पोस्टर फाडून जमिनीवर फेकले तसेच चप्पल, जोडे मारत निषेध केला. औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा देखील संतप्त कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आला. नागपूरसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज हे आंदोलन करण्यात आल्याचे गोविंद शेंडे म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने ही कबर हटवण्यासाठी मर्यादित वेळ घ्यावा असा इशारा केंद्र आणि राज्य सरकारला दिला गेला. दिलेल्या वेळेत ही कबर न हटविण्यात आल्यास बजरंग दल स्वतः पुढाकार घेत ही कबर हटवणार असा इशारा यावेळी गोविंद शेंडे यांनी दिला.
नागपूर- धर्मरक्षक छत्रपती महाराजांवर अनन्वित अत्याचार, हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या पावन भूमीवरून हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झाले. नागपुरात महाल स्थित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले गेले. या निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले.