Arun Lakhani | बिनविरोध निवड हा सुनबाई रेवतीचा पायगुण! : नवनिर्वाचित आमदार अरुण लखानी

पवार आणि सुळे या दिग्गज राजकीय कुटुंबासोबत आमचे कौटुंबिक संबंध जुळले. त्यानंतर लगेचच माझी विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली
Arun Lakhani
Arun LakhaniPudhari
Published on
Updated on

नागपूर: पवार आणि सुळे या दिग्गज राजकीय कुटुंबासोबत आमचे कौटुंबिक संबंध जुळले. त्यानंतर लगेचच माझी विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. हा सर्व प्रकार आमच्या घरची नवीन सुनबाई 'रेवती' हिचा भाग्यवान पायगुण आहे," अशी आनंदमयी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार अरुण लखानी यांनी व्यक्त केली.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यानंतर अरुण लखानी यांचे नागपुरात जोरदार आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

प्रतिक्रिया देताना अरुण लखानी म्हणाले की, "या निवडणुकीत माझी बिनविरोध निवड होईल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे." पुढे बोलताना त्यांनी आपल्या भविष्यातील कामाची दिशाही स्पष्ट केली. "मेळघाटपासून ते मुंबईपर्यंत पाण्याचे जे दुर्भिक्ष्य आहे, ते संपवण्यासाठी विधान परिषदेचा सदस्य म्हणून मी प्राधान्याने काम करेन," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आपले अभिनंदन केल्याचेही लखानी यांनी आवर्जून सांगितले.

बाबा आमदार झाल्याचा आनंद : सारंग लखानी

दरम्यान, अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. "बाबा आमदार झाले याचा आम्हा सर्वांना प्रचंड आनंद आहे," असे ते म्हणाले. पत्रकारांनी रेवतीबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, "रेवतीचाही अभिनंदनाचा फोन येऊन गेला आहे," असे सारंग यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news