नागपूर : शाळेला कनिष्ठ महाविद्यालय अर्थात ११ वी आणि १२ वीचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच प्रस्ताव त्रुटी न करता पुढे जाण्यासाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
सुशील पंढरीनाथ बनसोड (वय ४९, विस्तार अधिकारी), आणि नितीन राजाराम नेवारे, (वय 38, वरिष्ठ लिपिक), अशी याप्रकरणातील लाचखोरांची नावे आहेत. ज्युनियर कॉलेजसाठी सादर केलेला प्रस्ताव हा शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयात सादर करण्यासाठी या दोघांनी लाच मागितली. तक्रार देण्यापूर्वी तक्रारदाराने 5 हजार रुपये दिले. सदर प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नागपूर, यांचे कडे त्रुटी न काढता लवकर सादर केल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून उर्वरित पैसे आपल्याजवळ आणून देतो असे सांगितले. तक्रारदाराने ही माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला कळवली.
त्या माहितीनुसार लातूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. आणि वरिष्ठ लिपिकाला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांचे नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.