

नागपूर : कार शिकत असताना कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात बालभारती ग्राउंडवर ही घटना घडली. या तिघांचेही मृतदेह आणि कार मंगळवारी बाहेर काढण्यात आले.
मृतकांमध्ये सुरज सिद्धार्थ चव्हाण (वय 34), सजल सिद्धार्थ चव्हाण (वय 27) आणि संदीप चव्हाण (वय 27 रा. बुटीबोरी) या तिघांचा समावेश असून यातील दोघे भाऊ आहेत. यातील एक जण कार शिकत होता. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रात्री साडेअकरा वाजता हे तिघे कार शिकत असताना कार अनियंत्रित झाली आणि विहिरीत कोसळली. कारचा वेग इतका जास्त होता की विहिरीची संरक्षक भिंत तोडून ही कार विहिरीत पडली. काहींच्या मते विहिरीची भिंत मजबूत नव्हती. जवळपास २० फूट पाणी या विहिरीत होते. या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक पोलीस आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामन विभाग घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार आणि तिघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी बुटीबोरी पोलीस अधिक तपास करत आहेत.