

नागपूर: Nagpur News | डोळ्यात अश्रू, गळ्यात हुंदका अन् आपल्या भावासाठी चार महिन्यापासून पायी सुरू असलेली चारही दिशांची त्यांची सुरू असलेली भटकंती ! समाजात आपण पाहिलेच आहे की, स्वार्थासाठी भाऊ भावाचे वैरी होतात, असे खूप आहेत. मात्र एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आणि तेही एका मनोरुग्ण भावावर प्रेम करणारे जगात एखादाच भाऊ असा असेल, असे वाटते.
गेल्या काही दिवसात नागपूरमधील अनेक सार्वजनिक ठिकाणी एका हरवलेल्या माणसाची पोस्टर्स दिसतात. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील 62 वर्षीय आश्राप्पा रामप्पा बेदरे यांची ओंकार बेदरे नामक 48 वर्षीय मनोरुग्ण भावासाठी भटकंती सुरू आहे. पोलिसांकडूनही मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. या काळात केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील सर्व जिल्हे आश्राप्पा यांनी वारंवार पिंजून काढले आहेत.
आश्राप्पा बेदरे यांचा भाऊ गेल्या वर्षी २९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील अनेकदा आश्राप्पा यांना सोबत घेवून या मिसिंग प्रकरणाचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे फोटो प्रकाशित केलेत. बेवारस व्यक्तींचा शोधही घेण्यात आला. अनेक बेवारस लोकांना आश्रय देणारे आश्रम, रुग्णालये अशा अनेक ठिकाणी शोध सुरूच आहे. यासंदर्भात सांगायचे म्हणजे , काही वर्षांपासून आश्राप्पा यांच्या मोठ्या मुलावर आणि लहान भावावर नागपुरात उपचार सुरू होते. त्या दोघांना घरी घेऊन जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याने आश्रप्पा नागपुरात आले. २९ ऑक्टोबरला मनोरुग्णालयातून सुट्टी मिळाल्यामुळं ते ओंकारला आणि त्यांच्या मुलाला घेऊन बुलढाण्याला जाणार होते. सीताबर्डीत ऑटो रिक्षातून उतरल्यानंतर भावाचा हात धरून ते पोलीस ठाण्यासमोरून जात असताना दिवाळीच्या खरेदीसाठी सीताबर्डीत मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीत आश्रप्पांच्या हातातून ओंकारचा हात सुटला तो अजूनही सापडला नाही.
शोधाशोध करीत त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी त्यांची बोळवण केली. आश्राप्पा यांनी स्वत:च आपल्या भावाचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे यांची कैफियतच वेगळी आहे. बेदरे कुटुंबाच्या प्रत्येक पिढीतील एक तरी सदस्य हा मनोविकारग्रस्त आहे. सुरुवातीला आश्राप्पा यांची आई त्यानंतर त्यांचा भाऊ ओंकार आणि आश्राप्पा यांचा मोठा मुलगा देखील मनोविकारग्रस्त आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याककडे देखील त्यांनी आपल्या भावाला शोधून देण्याची मागणी केली. स्वतःच्याच विवंचनेत गुंतलेल्या या शहराच्या गर्दीत आपल्या घराचा,गावाचा पत्ता देखील सांगू न शकणाऱ्या आपल्या भावाचा कधीतरी शोध लागेल अशी भाबडी आशा ठेवून आश्रप्पाची भटकंती सुरूच आहे.