

नागपूर : राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती 100 टक्के खरी आहे. त्यात सत्यता आहे. कारण ईडी-सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भाजप सरकारमध्ये सामील व्हावे लागले, याची सर्वांना कल्पना आहे. छगन भुजबळ यांच्यावर दबाव होता. ते जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आली होती. त्यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे आणि जेलमध्ये जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय केला, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
हिंगणघाट (जि.वर्धा) येथील प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी हा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘अशाच पद्धतीचा दबाव माझ्यावरही होता. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की मी तुमच्या दबावाला जुमानणार नाही. तुम्ही वाटल्यास माझ्या पाठीमागे ईडी-सीबीआयची चौकशी लाऊन मला जेलमध्ये टाका. मात्र, उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधीही तुम्ही पाठवलेल्या ॲफिडविटवर स्वाक्षरी करणार नाही. मी स्पष्ट नकार दिला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी सीबीआय आणि ईडी अधिकारी आले. खरेतर मी पण यांच्याप्रमाणे भाजपबरोबर गेलो असतो, तर आज मी मंत्री झालो असतो. मात्र मला भाजपसोबत जायचे नव्हते म्हणून मला जेलमध्ये टाकले,’ असे त्यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेकांवर ईडी-सीबीआयचा दबाव भाजप आणि फडणवीस यांनी टाकला होता. दिल्लीतील सत्तेच्या दबावाखाली हे सर्व चालू होते,’ असाही आरोपही देशमुख यांनी केला.