Teakwood bull : साडेसात फूट उंचीचा सागवानाचा नंदीबैल नागपुरात ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

आठ फूट लांब भव्य नंदीबैल; तब्बल आठ लाख रुपये किंमत, पोळ्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भात चर्चा
Teakwood Nandi bull
Teakwood Nandi bull
Published on
Updated on

नागपूर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीशी नाते सांगणारा पोळा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असताना नागपुरातील लकडगंज बाजारात ठेवण्यात आलेल्या भव्य नंदीबैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल साडेसात फूट उंच आणि आठ फूट लांब असलेला हा नंदीबैल सागवानाच्या लाकडापासून तयार करण्यात आला असून, त्याची किंमत तब्बल आठ लाख रुपये असल्याची माहिती आहे.

वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील एका कारागिराने यावर्षी पोळ्याच्या निमित्ताने हा आकर्षक नंदीबैल साकारला आहे. सागवानाच्या लाकडाला सुबक आकार देत त्यावर करण्यात आलेले बारकावे आणि कोरीव काम यामुळे या नंदीबैलाचे रूप अधिकच उठून दिसत आहे. सध्या हा नंदीबैल नागपुरातील लकडगंज बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता वाढली आहे.

सोशल मीडियावरही नंदीबैलाची चर्चा

भव्य आकारमानामुळे हा नंदीबैल समाजमाध्यमांवरही चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, नेटिझन्सकडून त्याबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मंदिराच्या परिसरात किंवा दानपेटीजवळ सजावटीसाठी हा नंदीबैल ठेवता येऊ शकतो, अशी माहिती कारागिराने दिली आहे.

पोळा म्हणजे शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याचा उत्सव

पोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याच्या बैलजोडीतील जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव मानला जातो. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांची पोळ्याच्या दिवशी मनोभावे पूजा केली जाते. बैलांना सजवून त्यांची आरती केली जाते, त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी तान्हा पोळा साजरा केला जातो. बालगोपाल आपल्या लाकडी किंवा मातीच्या नंदीबैलांना सजवून या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे नंदीबैल हा ग्रामीण संस्कृतीत केवळ धार्मिक प्रतीक नसून शेतकरी जीवनाशी जोडलेला भावनिक भाग आहे.  या जिव्हाळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दाखल झालेला साडेसात फूट उंचीचा हा सागवानाचा नंदीबैल सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला असून, त्याच्या आठ लाखांच्या किमतीचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news