

नागपूर - शिक्षण विभागातील कोट्यवधींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा, बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात आज शुक्रवारी एका शिक्षकास अटक करण्यात आली. यामुळे अटकेतील आरोपींची संख्या 6 झाली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे महेंद्र भाऊराव म्हैसकर वय 43 वर्षे असे या अटकेतील आरोपीचे नाव असून तो गोंदियात शिक्षक आहे. कपिल नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्लॉट नंबर 118, राहुल बौद्ध विहाराजवळ आवळे नगर टेका नाका येथील रहिवासी आहे.
या प्रकरणी मोडस ऑपरेंडी कशी होती हे आता हळूहळू बाहेर येत असून शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांची एकीकडे सायबर पोलिस कसून चौकशी करीत असताना गोंदिया जिल्ह्यातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली. तो नरड यांना या बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात बोगस कागदपत्रे, बोगस प्रस्ताव तयार करून देत असल्याची माहिती आहे. नरड यांच्यासह पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर पोलिसांनी या पाचही आरोपींचा तीन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र,न्यायालयाने ती फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली.
या प्रकरणाचे धागेदोरे विदर्भात लांबवर आहेत. व्याप्ती रोज वाढत आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 35 ते 40 लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून घेत बनावट कागदपत्रे, सोमेश्वर नैताम नामक सेवानिवृत्त आणि हयात नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरींचा नियुक्ती पत्रासाठी झालेला वापर लक्षात घेता आता सुमारे 580 शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींवर टांगती तलवार आहे. राज्य सरकार,शिक्षण विभागाने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण करण्यात आली असून नियुक्तीपासून तर वेतन निश्चिती पथक, वेतन जमा करेपर्यंतचा सखोल तपास झाल्यास हा शेकडो कोट्यवधींचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे.