

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर विभागातील शिक्षण विभागातील कोट्यवधींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील मोडस ऑपरेंडी कशी होती. हे आता हळूहळू बाहेर येत असून शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांची एकीकडे सायबर पोलिस कसून चौकशी करीत आहेत. तर इकडे गोंदिया जिल्ह्यातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. महेंद्र भाऊराव म्हैसकर असे या संशयित आरोपीचे नाव असून तो नरड यांना या बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात बोगस कागदपत्रे, बोगस प्रस्ताव तयार करून देत असल्याची माहिती आहे.
नरड यांच्यासह संशयित पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर पोलिसांनी या पाचही आरोपींचा तीन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली. या प्रकरणाचे धागेदोरे विदर्भात लांबवर आहेत. व्याप्ती रोज वाढत आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 35 ते 40 लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून घेत बनावट कागदपत्रे, सोमेश्वर नैताम नामक सेवानिवृत्त आणि हयात नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरींचा नियुक्ती पत्रासाठी झालेला वापर लक्षात घेता आता सुमारे 580 शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींवर टांगती तलवार आहे.
राज्य सरकार, शिक्षण विभागाने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाण-घेवाण करण्यात आली असून नियुक्तीपासून तर वेतन निश्चिती पथक, वेतन जमा करेपर्यंतचा सखोल तपास झाल्यास हा शेकडो कोट्यवधींचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षक निलेश मेश्राम यानेच नियुक्तीसाठी आवश्यक बोगस कागदपत्रे तयार करून दिली असल्याने सदर पोलिसांनी निलेश मेश्रामसह तिघांना अटक केली. यात शिक्षण उपनिरीक्षक संजय शंकरराव सुधाकर (वय 53), लिपिक सुरज पुंजाराम नाईक (वय 40) अशी इतर दोघांची नावे आहेत.
शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना यापूर्वीच गडचिरोली येथून अटक करण्यात आली. दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली गेली. यानंतर पुन्हा एक दिवसांची पोलिस कोठडीत वाढ झाली. पोलिसांनी उल्हास नरड यांच्या कार्यालयातून चौकशीत महत्वाची कागदपत्रे मिळविली असून आता यातील इतर सहभागी कोण कोण आहेत त्याचे धागेदोरे जुळविले जात आहेत. नीलेश मेश्राम याने बनावट नियुक्ती पत्रासाठी पराग पुडके यांच्याकडून 10 लाख रुपये घेतल्याचे पुढे आले. सदर पोलिसात पहिली तक्रार झाली आणि पोलिस इतरही आरोपीपर्यंत पोहोचले. अर्थातच या कारवाईला वेग आल्याने आता शिक्षण विभागातील इतरही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बोगस शिक्षक नियुक्ती, नरड सायबर पोलिसांच्या ताब्यात !
नागपूर विभागात बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून 580 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत शिक्षण उपसंचालकासह पाच अधिकारी, कर्मचारी यांना अटक करण्यात आली होती. आता गोंदिया येथील महेंद्र म्हैसकर या शिक्षकाला अटक झाल्याने संशयित आरोपींची संख्या 6 झाली आहे. दुसरीकडे न्यायालयीन कोठडीमुळे कारागृहात रवानगी झालेले विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आता शुक्रवारी सायबर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मार्च महिन्यात बोगस शालार्थ आयडी हॅक प्रकरणी दाखल तक्रारींविषयी त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कालपर्यंत आपण यासंदर्भात आयडी हॅक प्रकरणी स्वतःच तक्रार केल्याचा बचावात्मक पवित्रा नरड यांच्यामार्फत केला जात होता. मात्र, पराग पुडके मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणी दाखल केलेली तक्रार आणि सायबर पोलिसात केलेली तक्रार या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. शिक्षक नियुक्ती ते वेतन निश्चिती अशी ही मोठी साखळी असा अनेक अधिकारी, कर्मचारी सहभाग थेट मंत्रालयापर्यंत असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
महेश जोशी यांनी माहितीच्या अधिकारात काही प्रकरणी माहितीबाबत तत्कालीन माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याकडे दाखल तक्रारीवर अधीक्षक भारती गेडाम यांनी तहसील कार्यालय परिसरातील गोडाऊनमधील कागदपत्रे पावसामुळे खराब झाल्याचे, माहिती देण्यास असमर्थ असल्याचे लेखी पत्र दिले. मुळात वर्षानुवर्षे हा घोटाळा, गैरप्रकार सुरू असल्याने माहिती उपलब्ध असूनही ती न देण्यामागे शिक्षण विभागातील आर्थिक कीड कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. सदर पोलीस तसेच सायबर पोलीस स्वतंत्रपणे याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार चौकशी करीत असल्याने हे धागेदोरे लवकरच उघड होण्याची चिन्हे आहेत.
मात्र, मुळात यापूर्वी देखील तक्रारी होऊन ठोस कारवाई न झाल्यानेच शिक्षण विभागासारख्या पवित्र क्षेत्रातही या भ्रष्ट प्रवृत्तीची हिंमत वाढत गेली. गेली 10 वर्षे हा बोगस नियुक्ती घोटाळा सुरूच राहिला. नागपूर विभागातच नव्हे तर राज्यातील एकूणच शिक्षण विभागात खळबळ माजवणाऱ्या या बोगस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
नागपूरच नव्हे तर पूर्व विदर्भ, इतर जिल्ह्यातील देखील तक्रारी येत आहेत. मात्र जोपर्यंत ठोस हाती लागणार नाही तोवर सांगता येत नाही असा सावध पवित्रा वरिष्ठ पोलिस अधिकारी घेत आहेत.
दरम्यान, शिक्षक नियुक्ती प्रस्ताव संदर्भात महत्वाच्या असलेल्या 600 शालार्थ आयडी हॅक प्रकरणी जानेवारी,मार्च महिन्यात तक्रार करण्यात आलेली आहे. तपासाचे भिजत घोंगडे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याकडे लक्ष वेधले असता या विषयीची कबुली देताना ही तांत्रिक बाब असल्याने सायबर पोलीस सखोल तपास करीत आहेत असे अलीकडेच पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले. न्यायाधीश, एसआयटी मार्फत चौकशीची मागणी होत असूनही तूर्तास शहर पोलिसांकडेच तपास कायम आहे.