

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात नामांकित ताज ग्रुप आपले अत्याधुनिक हॉटेल उभारणार असल्याची घोषणा ताज हॉटेल्सची संचालन कंपनी इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडने केली आहे.
मुंबईतील वांद्रे येथील ताज बँडस्टँड हॉटेलच्या पायाभरणी समारंभात ही घोषणा करण्यात आली. यासाठी टाटा समूह आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताज हॉटेलच्या पायाभरणी समारंभात टाटा समूहाने नागपुरात ताज हॉटेल बांधण्याची इच्छा व्यक्त केली. भाषणाच्या समारोपातच, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनीत चटवाल यांनी नागपुरात ताज ग्रुपचे हॉटेल उभारण्याची घोषणा केली.
टाटा समूहाने यापूर्वी नागपुरात हॉटेल जिंजर सुरू केले असून, त्याची दुसरी शाखा लवकरच सुरू केली जाईल, असे टाटा ग्रुपने जाहीर केले. ताज ग्रुपचा ब्रँड नागपूर शहरात येत असल्याने पर्यटन वाढीच्या दृष्टीने याचा मोठा फायदा होणार आहे.
इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड हा टाटा समूहाचाच एक भाग आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे ताज ग्रुपचे हॉटेल तयार होत आहे, तर नागपूरलगतच्या मध्य प्रदेशातील पेंच येथेही ताज ग्रुपचे हॉटेल आहे हे विशेष.
प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा, रतन टाटांपासून टाटा कुटुंबीयांचे नागपूरशी ऋणानुबंध आहेत. टाटा समूहाचा एम्प्रेस मिल हा पहिला वस्त्रोद्योग प्रकल्प 1877 मध्ये नागपूर शहरातच सुरू करण्यात आला होता. टाटा ग्रुपचे ताज हॉटेल शहरात व्हावे अशी अनेक वर्षांची इच्छा होती, आणि आता ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.