

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी 2020 मध्ये जीवन संपवले होते. परंतु बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी त्यांनी जीवन संपवले नसुन हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. याचा तपास मुंबई पोलिसांनी योग्यच केला, विरोधकांनी उगीच कांगावा केला असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला. पोलिस तपासात स्पष्टपणे समोर आले की, त्याने जीवन संपवले होते. नंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यांचा क्लोझर रिपोर्ट आता समोर आला असून त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार सुशांत सिंह राजपूत यांनी जीवन संपवल्याचे समोर आल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
मी गृहमंत्री असतांना सुशांत सिंह राजपूत यांनी जीवन संपवले. परंतु तेव्हाच्या विरोधकांनी आरोप केला होता की, राजपूत यांनी जीवन संपवले नसुन त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास बांद्रा पोलिसांनी सुरु केला. तपास सुरु असतांना अनेक बाबी समोर आल्यानंतर वारंवार मी सांगत होतो की, सुशांतसिंग यांची हत्या झाली नसुन त्यांनी जीवन संपवले आहे.
मुंबई पोलिसांचा तपास पुर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला रिपोर्ट सादर केला. त्यात सुध्दा सुशांतसिंग यांची हत्या करण्यात आली नसुन त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले होते. सुशांत सिंह हे मुळचे बिहारचे होते आणि त्यांचा जीवन संपवण्याचा फायदा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कसा घेता येईल यासाठी विरोधकांकडून ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला. सुशांतसिंग यांच्या वडीलांनी पाटणा येथे तक्रार देवून सुशांतसिंग यांची हत्या करण्यात आल्याची तसेच रिया चक्रवर्ती हिने 15 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केला होता. यावरुन या प्रकरणाचा तपास हा सी.बी.आय.ला देण्यात आला.