

काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून 2 महिन्यात वसुली करून ती रक्कम पीडितांना द्या. या मागणीसह नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्यातील सव्याज 1444 कोटींची वसुली करण्यासाठी सावनेर येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन रविवारी (दि.4) तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात आता ‘वसुली यात्रा’ काढली जाणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे सावनेर येथील बेमुदत ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, सावनेरतर्फे हे आंदोलन करण्यात आले.विविध भाजप नेत्यांनी यामध्ये सहभागी होत समर्थन दिले.जेएन पटेल कमिटीसमोर ज्यांचे पैसे बुडाले त्या शेतकऱ्यांचे व खातेदारांचे अर्ज गेले पाहिजेत. हे अर्ज घरोघरी जाऊन गोळा करा. नागपूर जिल्ह्यात फिरून आणि ‘वसुली यात्रा’ काढून अर्ज जमा करण्याचा अभिनंदनीय निर्णय घेण्यात आला आहे. हे अर्ज घेऊन डॉ. आशिष देशमुख हे संविधान चौकात येतील, तेव्हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिथे हे अर्ज घेण्यासाठी बोलावेन. या वसुलीकरिता लढावे लागणार आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता ही लढाई सुरु होईल. डॉ. आशिष देशमुख यांनी ही ‘वसुली यात्रा’ तातडीने काढावी. या राज्याचा अध्यक्ष म्हणून, उत्कृष्ट वकील म्हणून आपली बाजू सरकारसमोर मांडल्याशिवाय राहणार नाही.
जे पाप सुनील केदार यांनी केले आहे. ते अक्षम्य आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनाला भेट देत केले. मागील 22 वर्षात कित्येक पिडीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पगाराचे पैसे नोकरदार वर्गाला मिळाले नाहीत. कित्येक मुलींचे लग्न मोडले गेले. सुनील केदारांनी लोकांचे पैसे लुटले. त्यांच्या दहशतीमुळे लोकं बोलत नाहीत. ग्रामीण भागाला चालना देणाऱ्या जिल्हा परिषदेचे पैसे सुद्धा यात अडकले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील वसुली करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत कारण त्यांचे केदारांशी हितसंबंध आहेत. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी यात लक्ष घालून पीडितांना न्याय देण्याची गरज आहे अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी केली.