Sudhir Mungantiwar | मेरिटच्या विद्यार्थ्याला काहीही फरक पडत नाही; राज-उद्धव मनोमिलनावर सुधीर मुनगंटीवारांची खोचक टिप्पणी
Sudhir Mungantiwar on Raj Thackeray Uddhav Thackeray
नागपूर: दोन भाऊ एकत्रित येत असतील, तर भाजपच्या त्यांना निश्चित शुभेच्छाच आहेत. विरोध असण्याचे काही कारणच नाही, अशा शब्दांत माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.७) ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी राज्यातील नव्या राजकीय बदलाचे एकप्रकारे स्वागत केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या संदर्भात विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. दोन भाऊ एकत्र आले ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. मात्र, ते केवळ हिंदी भाषेची सक्ती विरोधात मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित आले. त्यांच्यात संवाद कसा आहे किंवा राहील. राजकीय दृष्ट्या ते एकत्रित असतील का ?, याबाबत सध्याच बोलता येणार नाही.
मात्र, त्या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे भाजपला कसलीही चिंता नाही. कारण एखाद्या वर्गात नवीन मुलगा अॅडमिशन घेऊन आला म्हणून आधीच असलेल्या मेरिटच्या विद्यार्थ्याला काहीही फरक पडत नाही. सत्ता हे आमचे लक्ष्य नाही. भाजप हा पक्ष मुळात केवळ सत्तेच्या दृष्टीने काम करत नाही, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

