

नागपूर : पायाभूत सुविधा व विकास कामांची गती समाधानकारक आहे. अनेक विकासकामे अजून सुरु आहेत. महानगराचा वाढता विस्तार लक्षात घेत भविष्यातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन नियोजनावर भर दिला पाहिजे. आर्थिक संतुलनाकरिता महसूली उत्पन्न कसे वाढेल याबाबतीत अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.
मेट्रो भवनला भेट देवून महामेट्रो, नागपूर विकास प्राधिकरण, महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामाचा त्यांनी आढावा घेतला. मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यवसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कशाप्रकारे पुढे आणता येईल त्याच्या उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, विकास कामांच्या विस्तारासमवेत आपल्या आर्थिक क्षमताही विस्तारल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण प्रत्येक प्रकल्पातील व्यावसायिक क्षमता वाढविणार नाही तोपर्यंत विकासाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले स्त्रोत हे आपण बळकट केले पाहिजे. फर्स्ट अँड लास्ट माईल कनेटिव्हिटी अंतर्गत नागपूर महानगरपालिका सोबत योग्यरित्या नियोजन करून मल्टीमॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. आंतराराष्ट्रीय दर्जाची पायाभूत सुविधा आज नागपूर, पुणे शहरामध्ये उपलब्ध आहे. ही अभिमानाची बाब आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नासुप्र सभापती संजय मीणा, महा मेट्रो संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी उपस्थित होते.