

नागपूर ः भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर मंगळवारी विधानसभेत गंभीर चर्चा झाली. यात सर्वपक्षीय आमदारांनी सहभाग घेऊन या समस्येवर वेगाने तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर याप्रश्नी मंत्रालयात बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील बिबट्यांच्या समस्येवरही लक्षवेधी मांडण्यात आली होती. तथापि भटक्या कुत्र्यांचा विषय अधिक गाजला. त्रस्त आमदारांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी बिबट्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. बिबट्या जंगलात राहतो. पण भटकी कुत्री गल्लीबोळात आढळतात, असे सदस्यांनी निदर्शनास आणले.
अतुल भातखळकर, महेश लांडगे, सुनील प्रभू, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले या आमदारांनी लक्षवेधीद्वारे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही.
अखेर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करत या समस्येवर मंत्रालयात बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरात सोडावे, अशी सूचना केली. प्राणीप्रेमींना या समस्येची जाणीव होईल, असे ते म्हणाले. सुनील प्रभू म्हणाले, आम्ही एखाद्या वस्तीत गेल्यास भटकी कुत्री मागे लागतात; जर आम्हाला कुत्रे चावले तर काय करणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला. आमदारांनी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव भयंकर असल्याचे सांगत, त्यांच्या निर्बीजीकरणाची आणि त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याची मागणी केली. मात्र राज्यमंत्री यावर समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत.