

Sharad Pawar on Maharashtra Assembly Election
नागपूर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एक सनसनाटी विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करीत खळबळ उडवून दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील एकंदर 288 जागांपैकी 160 जागा जिंकण्याची खात्री देणारे दोघेजण आपल्याला भेटले होते. आपण त्या दोघांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घालून दिली. मात्र, या मार्गाने आपण जाऊ नये, जनतेचा निर्णय मान्य करू, असे आमचे ठरले असेही पवारांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या दोघांची नावे, पत्ते सध्या माझ्याकडे नाहीत, असे सांगत त्यांनी सावध पवित्रा घेतला.
ओबीसी समाजाच्या जनजागरणदृष्टीने निघणारी यात्रेला हिरवी झेंडी आणि नेते,पदाधिकारी संवाद दृष्टीने दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असलेले शरद पवार आज (दि.९) पत्रकार क्लब येथे वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, आपल्याला निवडणूक आयोग या संस्थेविषयी कमालीचा आदर होता. मात्र जे काही समोर येत आहे त्याविषयीचा संभ्रम दूर होणे गरजेचे आहे. मुळात भाजपने नाहीतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर उत्तर द्यायला हवे, असे सांगत पवार यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार निवडणूक आयोगावरील शंकांचे उत्तर देत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने या संदर्भात सखोल चौकशी केली पाहिजे दूध का दूध पाणी.... ! झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. शेवटी सत्य समोर यायला पाहिजे, असे ते म्हणाले.
एकीकडे काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र व इतर राज्यात निवडणूक आयोगाने भाजपच्या सोयीची भूमिका घेतली. मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी झाली, अशा पद्धतीचे आरोप अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन केल्यानंतर आता शरद पवार यांच्या या आरोपांनी राजकीय वातावरण तापणार आहे. मात्र, भाजप शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी या दोन्ही नेत्यांच्या विधानांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज नाही. तुमच्याकडे असे लोक आले, तर त्याची तक्रार का केली नाही. तपास यंत्रणांनी याविषयीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.