

नागपूर : नागपूर-गोवा या प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारने या महामार्गाचे सोलापूर-चंदगड (कोल्हापूर) संरेखन (अलाईनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला असून, नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाताना पंढरपूरजवळूनही जाणार आहे. महामार्गाचे काम पुढील वर्षी सुरू होणार असून, त्यासाठी जमीन संपादन सुरू केले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, नागपूर-गोवा द्रुतगती ‘शक्तिपीठ’ मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे, त्याचे नाव जरी नागपूर-गोवा असे असले, तरी याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे, मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल आणि यासंदर्भात मागच्या काळामध्ये लोकांचे काही आक्षेप आले होते. सोलापूरपासून ‘शक्तिपीठ’ मार्गाची अलाईनमेंट ही राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात होती, हा लोकांचा आक्षेप खरा होता. त्यानुसार संरेखनात बदल करण्यात आले आहेत. जयकुमार गोरे आणि सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासून एक वेगळी नवीन अलाईनमेंट तयार केली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, ही वेगळी नवीन अलाईनमेंट सोलापुरातून सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरच्या चंदगडकडे जाईल. ‘शक्तिपीठ’च्या पहिल्या संरेखनातून आमचे जयंतराव (पाटील) पहिल्यांदा सुटून गेले होते; पण ‘शक्तिपीठ’ आता त्यांच्या मतदारसंघाजवळून जात आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग लवकर करा, याचा मोठा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे.
गती-शक्तीमुळे बरीच वनजमीन ‘शक्तिपीठ’ महामार्गातून वगळता आली. 2026 पर्यंत याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे नागपूर ते गोवा 18 तासांचा प्रवास 8 तासांवर येईल. या महामार्गामुळे आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला उद्योगांची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे जेथून अलाईनमेंट आधी काढली होती, तेही लोक आता म्हणताहेत की, रचना बदलू नका. चंदगड येथील लोकांनी मोर्चा काढून आम्हाला हा महामार्ग हवा असल्याचे सांगितले होते, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. ‘शक्तिपीठ’ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे, असे ते म्हणाले.