महाराष्ट्राला पंप स्टोअरेज हब बनवण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री

कोयना, पश्चिम घाट, सरोवर प्रकल्पासाठी 23,800 कोटींची गुंतवणूक
Devendra Fadnavis
महाराष्ट्राला पंप स्टोअरेज हब बनवण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्रीPudhari News Network
Published on
Updated on

नागपूर : महाराष्ट्राला पंप स्टोअरेज हब बनवण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. पंप स्टोअरेज प्रकल्पाच्या उभारणीसाठी बुधवारी झालेल्या तीन करारांमुळे 5 हजार 800 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. 23 हजार 800 कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीतून 11 हजार 500 रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर, राज्याने पंप स्टोअरेजमध्ये 76 हजार 115 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, कोयना टप्पा-6 उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि जेएसडब्ल्यू निओ एनर्जी, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी आणि न्यू एशियन इन्फ्रा. डेव्हलपमेंट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले. या कार्यक्रमास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पंप स्टोअरेज क्षमतेच्या द़ृष्टीने देशात आघाडीवर आहे. आपल्याकडे पश्चिम घाट आणि मोठ्या धरणांची प्रणाली असल्याने पंप स्टोअरेजसाठी अत्यंत अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे. नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोअरेज प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण 54 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे 76 हजार 115 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे रुपये 4.06 लाख कोटी इतकी गुंतवणूक व 1.25 लाख मनुष्यबळ रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सामंजस्य करारातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांची नावे व थोडक्यात माहिती...

पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प

या प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लिमिटेड हे गुंतवणूक करणार असून, पुणे जिल्ह्यातील भोर आणि रायगड जिल्ह्यात महाड येथील या प्रकल्पाची 5,200 मेगावॅट स्थापित क्षमता असून, 19,950 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 7,000 रोजगारनिर्मिती होणार आहे. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.

कोयना टप्पा-6 उदंचन जलविद्युत प्रकल्प

या प्रकल्पासाठी महाजेनको रिन्यूएबल एनर्जी हे गुंतवणूक करणार असून, कोयना, येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची 400 मेगावॅट स्थापित क्षमता असून, 2,800 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2,500 रोजगारनिर्मिती होणार आहे.

सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प

या प्रकल्पासाठी न्यू एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट गुंतवणूक करणार असून, अहिल्यानगर येथील अकोले येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची 200 मेगावॅट स्थापित क्षमता असून, 1 हजार 50 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 2,000 रोजगारनिर्मिती होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news