Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | संजय गांधी निराधार योजनेचा 'आधार'च निखळला, हजारो लाभार्थी मदतीपासून वंचित
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Update
नागपूर : राज्यातील हजारो गरजू आणि निराधार नागरिकांसाठी आशेचा किरण असलेली संजय गांधी निराधार योजना सध्या स्वतःच 'निराधार' झाल्याचे चित्र आहे. नागपूरसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दमडीही मिळालेली नाही.
डीबीटी प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी
शासनाने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली लागू केल्यानंतर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे अनेक कुटुंबं आर्थिक कोंडीत सापडली आहेत.
तांत्रिक घोळ आणि प्रशासकीय उदासीनता
शासनाने पारदर्शकतेच्या उद्देशाने डीबीटी योजना आणली असली, तरी प्रत्यक्षात मात्र यामुळे अनेक लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. अनेकांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न (लिंक) नाहीत, तर काहींकडे मोबाईल फोन नसल्याने किंवा क्रमांक बदलल्याने त्यांना आवश्यक माहिती अद्ययावत करता आलेली नाही. या तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर
केवळ नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास, येथे संजय गांधी निराधार योजनेचे दीड लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी तब्बल २० टक्क्यांहून अधिक, म्हणजेच हजारो लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून योजनेचे पैसेच मिळालेले नाहीत. ही आकडेवारी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत
ही समस्या केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. संजय गांधी निराधार योजनेवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिला ज्यांना या योजनेचा मोठा आधार असतो, त्यांना या दिरंगाईचा सर्वाधिक फटका बसत आहे.
निराधारांसाठी ही योजना निराशेचे कारण ठरू शकते?
शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, 'निराधार' लोकांसाठी असलेली ही योजनाच त्यांच्यासाठी आणखी एका निराशेचे कारण ठरू शकते.

