

नागपूर : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत होती. परंतु आता ही मुदत २ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र शिक्षण संचालक (प्राथ.) शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.
आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून हजारो पालक अर्ज करीत असतात. गतवर्षी ही संपूर्ण आरटीईची प्रक्रियाच विलंबाने सुरू झाली होती आणि त्यातही सुरुवातीला या प्रक्रियेमध्ये अनुदानित व शासकीय शाळांचाही समावेश केल्याने पालकांनी न्यायालयाचे दार ठोठाविले होते. त्यानंतर आरटीईतून शासकीय आणि अनुदानित शाळा वगळण्यात आल्या होत्या. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड विलंब झाल्याने गतवर्षी अपेक्षेच्या तुलनेत अर्जही सादर झाले नव्हते, तसेच प्रवेशही कमी झाले होते. परंतु यंदा नोंदणीमध्ये पूर्वीपासूनच शासकीय आणि अनुदानित शाळांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ६४६ शाळांनी नोंदणी केली असून, जिल्ह्यासाठी ७००५ जागा राखीव आहेत.
आजवर राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक अर्ज नागपुरातुन आले आहेत. जिल्ह्यातुन आजवर२५ हजार ९५५ वर पालकांनी अर्ज केले आहेत. तर आता २७ जानेवारीपर्यंत असलेली अर्ज प्रक्रियेची मुदत वाढवून ती २ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र शिक्षण संचालक (प्राथ.) शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.