

नागपूर : महाविकास आघाडीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाले असून उर्वरित एक दोन दिवसांत होईल. पश्चिम नागपुरात शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे विरोधात लढणारे नरेंद्र जिचकार माजी मंत्री सुनील केदार यांचा फोटो वापरत असले, तरी ते निलंबित असून पक्षात नाहीत. शहरातील सर्व 6 जागा काँग्रेसने लढाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.
नागपुरात काँग्रेसचे दोन आमदार असून दोन जागा गेल्यावेळी थोडक्यात गमावल्या. यावेळी दक्षिण शिवसेना उबाठा तर पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.एकंदरीत सर्व जागा लढण्याच्या भूमिकेमुळे नागपुरातील दक्षिण नागपुरात सांगली पॅटर्नच्या तयारीत काँग्रेस दिसत आहे. खान म्हणाले की, आज ब्लॉक अध्यक्षांनीही तशी मागणी केली आहे. शेवटी महाविकास आघाडीत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले. मंगळवारी सकाळपासून शहरातील सहा मतदारसंघातील संभाव्य काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती रविभवनला झाल्या. नागपूर शहर 72 आणि जिल्हा 41 असे मिळून 113 इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.
आज सकाळपासून नसीम खान यांनी नागपूर शहराच्या सर्व ब्लॉक आणि जिल्हा अध्यक्षसोबत स्थानिक प्रमुख नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद यांच्याशी सल्लामसलत केल्याची व मविआचे सरकार येईल, असा दावा केला. हा मुलाखतीचा फार्स नाही, आम्ही लवकरच नावांची यादी केंद्रीय कार्य समितीला प्रस्तावित केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.