

नागपूर : राजेंद्र उट्टलवार
मराठ्यांच्या अधिपत्त्यात तब्बल 105 वर्षे राहिलेल्या शिवकालीन किल्ले विजयदुर्गचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊनच मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार ताब्यात घेत पर्यटन प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. ही युद्धनौका आतापर्यंत भारतीय नौदलाच्या अंदमान-निकोबार कमांडच्या ताब्यात होती. आता ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) च्या स्वाधीन करण्यात आली आहे. (INS Guldar)
'आयएनएस गुलदार' लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणून शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल. विजयदुर्ग खाडीत समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे. ज्यांना स्कुबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी MTDC तीन ते चार पाणबुड्या विकत घेणार आहे. मालवणच्या वेंगुर्लाजवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका MTDC ने मागितली होती. भारतीय नौदलात चाळीस वर्षे सागरी सेवा दिलेल्या या युद्धनौकेला भारतीय नौदलाने कारवार नौदल तळ, जिल्हा उत्तर कानडा येथे MTDC कडे आज हस्तांतरित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या विजयदुर्ग खाडीत ही युद्धनौका पर्यटकांना समुद्राच्या आतून पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयासोबत पाठपुरावा करुन हा प्रकल्प पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनविकास मंत्री शभुराजे देसाई, राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. मराठ्यांच्या अधिपत्यात तब्बल 105 वर्षे राहिलेल्या किल्ले विजयदुर्गचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊनच हा प्रकल्प येथे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्ले विजयदुर्ग आणि त्याचे आरमारी साम्राज्य इतिहासाच्या पानावर अधोरेखित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 23 राज्यांमधील 40 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देत त्यासाठी निधी जाहीर केला होता. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्टिफिशियल रीफ आणि अंडरवॉटर म्युझियमचाही समावेश आहे. भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका 'आयएनएस गुलदार' ही सागरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन सेवा निवृत्त झाली आहे. 12 जानेवारी रोजी, चार दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर तिला नौदलातून कार्यमुक्त करण्यात आले.
16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता. आरमारी युद्धनितीसाठी महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा प्रकारच्या असंख्य युद्धनौका बांधल्या जात होत्या. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघवट खाडी निश्चित करण्यात आली. ही खाडी सुमारे 42 किलोमीटर लांब आणि 40-50 मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ-वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित मानली जात असे. तसेच आरमारी गनिमी काव्यासाठीही हे मोक्याचे ठिकाण होते.