

नागपूर/रामटेक: ऐतिहासिक आणि पवित्र रामटेकच्या भूमीत येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी १८वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमासोबतच त्यांची विद्वत्ता, बहुभाषिक ज्ञान आणि साहित्यिक योगदान जनमानसापर्यंत पोहोचवणे, हा संमेलनामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.
या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सुप्रसिद्ध साहित्यिका उषा राऊत सांभाळणार आहेत. तर सुभाष चव्हाण यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे मुख्य आयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष नामदेव राठोड आहेत.
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते बहुभाषिक विद्वान आणि प्रगल्भ साहित्यिक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या ग्रंथांमधून दिसून येणारी विद्वत्ता, विचारांची व्यापकता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
संमेलनात विविध परिसंवाद, ग्रंथदिंडी आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य, त्यांचे विचार आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू यावर साहित्यिक व विचारवंतांकडून चर्चा केली जाणार आहे.
या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. रामटेक आणि परिसरातील साहित्यरसिकांनी या वैचारिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.