

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकुल योजनेच्या (शहरी) उद्दिष्टाची १०० टक्के पूर्तता झाली आहे. या योजनेंतर्गत एकूण २ हजार ८ घरकुल प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरिकांना दिला जातो. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येते. जिल्हास्तरावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
शासनाने नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता २ हजार घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात आले.
याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व दहा प्रभागांमध्ये २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी विविध वस्त्यांमध्ये जाऊन माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच जनमाध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. या प्रयत्नांमुळे निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच २ हजार ८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.