

नागपूर : पुढारी वृत्तसेवा; विधान परिषदेचे सभापती म्हणून अखेर भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे (Ram Shinde) यांची आज गुरुवारी विधान परिषदेत (Maharashtra Legislative Council) आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली. या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली.
सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे, उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सदस्या मनीषा कायंदे, अमोल मीटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. प्रा.राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून पदभार सोपविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले.
अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही. शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कालच निवड निश्चित झाली होती. आज, गुरुवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त होते. मंत्रिमंडळातील खातेवाटपाप्रमाणे महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये सभापतिपदासाठी चढाओढ सुरू होती.
उपसभापती डॉ. नीलम गो-हे (Neelam Gorhe) यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा होती. तसे प्रयत्नही शिंदे गटाकडून करण्यात आले. मात्र, विधान परिषदेतील भाजपचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडूनच या पदावर दावा केला जाणार, हे निश्चित मानले जात होते. भाजपमध्ये राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावांचीही चर्चा होती. तरीही भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांच्या नावाला पसंती दिली गेली. त्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे अर्ज सादर केला. तर आज त्यांच्या निवडीची एकमताने अधिकृत घोषणा झाली.