

नागपूरः राजेंद्र उट्टलवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी रविवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नागपुरातील राजभवनात होत आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन जोमाने कामाला लागले असून केवळ निमंत्रितांसाठी हा सोहळा असणार आहे. अजूनही इच्छुकांना फोन न आल्याने समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.
दुसरीकडे राजभवन सज्ज होत असून राज्यपाल सी. राधाकृष्णन नागपूरच्या दिशेने मुंबईवरून निघाले आहेत. महायुती सरकारमध्ये भाजपला अर्थातच सर्वाधिक मंत्रिपदे असे झुकते माप राहणार असून त्या पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शपथ घेणार आहेत. काही दिग्गज मंत्र्यांना यावेळी मंत्रिमंडळात धक्का दिला जाऊ शकतो. काहींना पक्ष संघटनेचे काम सोपवले जाऊ शकते अशी माहिती आहे. नव्या चेहऱ्यांना तीनही पक्षात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1991 मध्ये अतिशय नाट्यमय घडामोडी शिवसेना सोडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 9 सदस्यांसह काँग्रेसचा हात धरला होता. त्यावेळी तातडीने हा शपथविधी सोहळा नागपुरात झाला होता. आता 1991 नंतर प्रथमच राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरातील राजभवनात होणार असल्याने राजकीयदृष्ट्या देखील मोठी उत्सुकता आहे.