

नागपूर : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना सुरू असलेल्या बोगस खते आणि कीटकनाशकांच्या कारखान्यावर नागपूर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली आहे. नागपूरजवळील लावा गावात टाकलेल्या या छाप्यात तब्बल ५२ लाख ६१ हजार रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरपासून २५ किमी अंतरावर खडगाव रोडवरील लावा गावात एका गोदामात 'एनजेपी ॲग्रोटेक' या नावाने हा अवैध कारखाना सुरू होता. परेश विजय खंडाईत नावाचा तरुण शासनाची कोणतीही परवानगी न घेता 'निम पॉवर', 'भूशक्ती', 'ब्लॅक गोल्ड' अशा आकर्षक नावांनी बनावट जैविक उत्पादने, रासायनिक खते आणि कीटकनाशके तयार करून ती पिशव्या व बाटल्यांमध्ये भरत होता. या गोरखधंद्याची गुप्त माहिती मिळताच कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत पथकाने १५ टन रासायनिक खत, २ टन द्रवरूप उत्पादने, पॅकिंग मशिन, रिकामी पोती आणि बाटल्या असा एकूण ५२ लाख ६१ हजारांचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परेश खंडाईत याच्याविरोधात वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
कृषी विभागाचे संचालक अशोक किरनळी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बनावट कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.