

नागपूर : कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत बालकांवर झालेल्या लैंगिक शोषणाची घटना अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी आहे. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून विशेष तपास अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कारवाईचे स्पष्ट मागणी केली आहे.
पुसागोंदी आश्रमशाळेतील शिपाई राजेश मुलचंद मालापुरे याने १७ ऑगस्टच्या रात्री अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांत पोक्सो, बाल न्याय अधिनियम आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश मालापुरे याच्याविरुद्ध यापूर्वीही वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे अशाच स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याला आश्रमशाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी सेवेत ठेवणे, हा संस्थाचालकांचा अत्यंत निष्काळजीपणा आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून २५० विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून, एका विद्यार्थिनीनेही छेडछाडीची तक्रार केल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची दाट शक्यता अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल यांच्या थेट मार्गदर्शनाखाली विशेष तपास अधिकारी नियुक्त करून निष्पक्ष व गतिमान तपास करावा. आरोपीविरुद्ध न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करून कठोर शिक्षेची मागणी करावी, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला सेवेत ठेवून मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या संस्थाचालक आणि व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करून कडक पावले उचलावीत, भीतीपोटी मानसिक धक्क्याखाली असलेल्या आश्रमशाळेतील सर्व २५० मुला-मुलींचे सुरक्षित वातावरणात तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत समुपदेशन करण्यात यावे, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी पोलिस अधिक्षकांना लिहिलेल्या पत्रातुन केली आहे.