नागपूर : पुढारी वृत्तसेवा
राज्य विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या. विधानसभेची मुदत संपली. राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार पुन्हा स्थानापन्न होण्याची चिन्हे आहेत. मात्र 23 नोव्हेंबरला निकाल लागूनही तीन दिवसात मुख्यमंत्री कोण या विषयीचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. दुसरीकडे डिसेंबर महिन्यात नागपुरात होऊ घातलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यात प्रशासन गुंतले आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभा विधान परिषदेची इमारत डिजिटलायझेशन सोबत सज्ज झाली आहे. 1914 साली बांधण्यात आलेली ही इमारत असून त्याकाळी नागपूर शहर मध्य प्रदेशमध्ये होते. सीपी बेरार अंतर्गत मध्य प्रदेशची राजधानी असल्याने अधिवेशन याच ठिकाणी होत होते. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन नागपुरातील विधान भवन इमारतीत १० नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 1960 या काळात झाले. 1993 मध्ये विधानभवनाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम झाले.
नव्या इमारतीत विधानसभेचे तर जुन्या इमारतीत विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. राजकीय दृष्ट्या राज्यातील अनेक स्तित्यंतरे या सभागृहांनी अनुभवली. आता नव्या सुसज्ज धोरणानुसार आमदारांना विधानसभेतील कामकाज आता कागदपत्रऐवजी त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या संगणकावर थेट बघता येणार आहे. पूर्वी खूप सारी कागदपत्रे घेऊन बसणाऱ्या आमदारांना आता संगणकांचा आधार असणार आहे. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय, शाखा अभियंता संदीप चाफले यांच्या मार्गदर्शनात हे काम गेले काही दिवस सुरू आहे. टेबल, कार्पेट खुर्च्या असा सारा विधानभवनाचा लुक बदलण्यात आला आहे. अर्थातच नव्या बहुमताच्या सरकारसाठी, हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरातील विधान भवन सज्ज झाले आहे. साधारणत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल असा अंदाज आहे.